नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिका, चीन आणि रशियाच्या नेत्यांमध्ये झालेल्या त्रिपक्षीय बैठकीवरून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्रात काँग्रेसचे सरकार असते, तर भारताचे पंतप्रधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत एकाच टेबलावर बसले असते, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी समाजमाध्यमांवरील ‘एक्स’ या मंचावर ट्रम्प, शी जिनपिंग आणि पुतिन यांच्या त्रिपक्षीय बैठकीचा फोटो शेअर केला. त्यासोबत त्यांनी लिहिले, ‘काँग्रेस सत्तेत असती, तर भारताचे पंतप्रधान या टेबलावर बसले असते. तडजोड करणारा पंतप्रधान या टेबलावर कधीही बसू शकत नाही.’राहुल गांधी यांची ही टिप्पणी गुरुवारी चीन, रशिया आणि अमेरिका यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय बैठकीनंतर आली.या बैठकीत तिन्ही देशांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे, तेलाचा पुरवठा वाढवणे आणि अण्वस्त्रांशी संबंधित धोके कमी करण्यासाठी चर्चा सुरू ठेवण्यावर सहमती दर्शवली.
चीनच्या तंत्रज्ञान केंद्र असलेल्या शेनझेन येथे ही बैठक पार पडली. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सहभागी झाले होते. या तिन्ही नेत्यांच्या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात जागतिक मुद्द्यांवर परस्पर संवाद आणि सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला.