मुंबई : शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटातील ६ खासदारांनी सोमवारी पक्षांतर करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर यांचा समावेश आहे. पक्षप्रवेश सोहळ्यात एकनाथ शिंदे यांनी या खासदारांचे स्वागत करत, हे सर्व कट्टर शिवसैनिक आमच्या कुटुंबात परतल्याचे वक्तव्य केले. यावेळी शिंदेंनी २२ जून २०२२ च्या बंडाची आठवण करून देत हा लढा शिवसेनेच्या विचारधारेचे रक्षण करण्यासाठी असल्याचे सांगितले.
खासदार संजय जाधव, संजय देशमुख आणि संजय दिना पाटील यांच्या प्रवेशामुळे आपल्याकडे “ट्रिपल संजयची ताकद” आल्याचेही शिंदे यांनी नमूद केले. विरोधकांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेत शिंदे यांनी त्यांना ‘रील स्टार’ नव्हे तर जनतेच्या मनातील ‘रिअल स्टार’ असे सांगत त्यांची पाठराखण केली.या प्रवेशानंतर शिंदे यांनी स्पष्ट केले की, हे सर्व सहा खासदार आगामी लोकसभा निवडणूक शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरच लढतील आणि पुन्हा महायुतीचे खासदार म्हणून निवडून येतील.
महायुतीतील समीकरणांवर परिणाम
या मोठ्या पक्षांतरामुळे महायुतीतील (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी) जागावाटपाच्या चर्चांना नव्याने तोंड फुटले आहे. काही खासदारांनी २०२४ च्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात विजय मिळवला होता, त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये जागांवरील हक्क कोणाचा यावरून नवे राजकीय प्रश्न निर्माण झाले आहेत.राजकीय विश्लेषकांच्या मते, या घडामोडीमुळे शिंदे गटाची ताकद लोकसभेत मोठ्या प्रमाणात वाढली असून महायुतीतील समतोलावरही परिणाम होऊ शकतो.