ट्रक चालकाला ग्लानी आल्याने झाला घात
पुणे : जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान सोमवारी (१३ जुलै) सकाळी सासवड-जेजुरी मार्गावर वारकऱ्यांचा भीषण अपघात झाला. यात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला. ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना सासवड-जेजुरी टोलनाक्याजवळ घडली. अपघातात चार वारकरी महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर जेजुरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. मृत महिला वारकऱ्यांची नावे राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे, नंदा पवार अशी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याने सासवडहून जेजुरीकडे प्रस्थान ठेवले. जेजुरीत पालखी सोहळा मुक्कामी आल्यानंतर ही दुर्देवी घटना घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तीन वारकरी महिला मूळच्या सांगली जिल्ह्यातील कसबेडिग्रज गावच्या रहिवाशी आहेत. अपघातात अन्य चार महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर जेजुरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली. ट्रक चालकाला ताप आल्यामुळे त्याने गोळ्या घेतल्या होत्या. त्यामुळे त्याला ग्लानी आली, अशी माहिती मिळत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात असलेल्या रघुनाथ महाराज पोखरबिसीकर दिंडीतील ट्रकने सासवड-जेजुरी रस्त्यावरील बेलसर टोलनाक्याजवळ साईदीप लाॅजजवळ सात वारकरी महिलांना धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तीन वारकरी महिलांचा मृत्यू झाला. अपघातात चार वारकरी महिलांवर जेजुरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. नेमका कसा अपघात झाला, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. अपघात करणाऱ्या ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. धडक इतकी भीषण होती की, तिन्ही महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरात शोककळा पसरली आहे.
वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
उपरोक्त घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी फेसबुकवर आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी म्हटले की, आज सासवड–जेजुरी मार्गावर झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. या अपघातात ज्या तीन वारकरी भगिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली असून त्यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहणार नाही, याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्याची काळजी घ्यावी. जखमी भगिनी लवकर बऱ्या व्हाव्यात, हीच विठ्ठल चरणी प्रार्थना.
वारकऱ्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घ्यावी – रोहित पवार
“दिंडीतील वाहनानेच धडक दिल्याने जेजुरीजवळ ३ वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आणि दुःखद आहे. या दुर्घटनेत काही वारकरी जखमी झाले असून ते लवकर बरे व्हावेत, ही श्री विठुरायाच्या चरणी प्रार्थना! हा अपघात कसा झाला याची सखोल चौकशी करुन पुन्हा अशी घटना घडू नये याची दक्षता घेऊन प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घ्यावी, ही विनंती!” असे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे.