लॉरेन्स बिश्नोईचा राईट हँड ‘हॅरी बॉक्सर’ अटकेत

0

नवी दिल्ली : हरियाणाचा मोस्ट-वॉन्टेड गँगस्टर हॅरी बॉक्सरला अमेरिकेतून अटक करण्यात आले आहे. लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा साथीदार म्हणून तो अमेरिकेतून बिश्नोई गँग चालवत होता. चित्रपट निर्माता रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी बॉक्सरने स्वीकारली होती आणि त्यानंतर सोशल मीडिया पोस्ट आणि ऑडिओ संदेशांद्वारे बॉलिवूड सेलिब्रिटींना धमक्या दिल्या होत्या. त्याच्यावर खून, धमकी आणि खंडणीसह अनेक आरोप आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे त्याला शुक्रवारी रात्री कॅलिफोर्नियामध्ये अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वी गँगस्टर हिमांशू भाऊ आणि नीरज फरीदपुरिया यांनाही अमेरिकेत ताब्यात घेण्यात आले होते.

फेब्रुवारीमध्ये रोहित शेट्टीच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबारानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक व्यक्तींना धमक्या मिळाल्या होत्या. या हल्ल्याची जबाबदारी गँगस्टर हॅरी बॉक्सरने स्वीकारली होती. या घटनेनंतर, लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असलेला एक बॉक्सर सोशल मीडिया पोस्ट आणि ऑडिओ संदेशांद्वारे चित्रपटसृष्टीतील सदस्यांना धमक्या देत होता. अशाच एका ऑडिओ संदेशात, अर्जुन बिश्नोई नावाने ओळख सांगणाऱ्या एका व्यक्तीने बॉक्सर आणि शुभम लोणकर यांची नावे घेत गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली. त्या संदेशात म्हटले होते की, शेट्टी यांना टोळीच्या कारवायांमध्ये हस्तक्षेप न करण्याची वारंवार ताकीद देण्यात आली होती आणि या हल्ल्याला एक छोटासा ‘टीझर’ म्हटले होते. या धमक्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना किंवा टोळीच्या शत्रूंना पाठिंबा देणाऱ्यांना आणखी गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, ते ऑडिओ रेकॉर्डिंगच्या सत्यतेची आणि फेब्रुवारीतील हल्ल्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या कथित सहभागाची चौकशी करत आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech