प्रकृती पूर्णपणे स्थिर, पुढील उपचार घरीच सुरू राहतील
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. श्वसन आणि छातीत संसर्ग झाल्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. वाढते वय आणि सततच्या दौऱ्यांमुळे त्यांना श्वसनाचा आणि छातीत संसर्गाचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना दोन दिवसांपूर्वी तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारांना त्यांनी चांगला प्रतिसाद दिल्यानंतर आणि प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत त्यांना दुसर्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी पुण्यातील रुबी रुग्णालयात देखील दाखल केले होते.
दरम्यान रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी, शरद पवार यांना डॉक्टरांनी काही दिवस सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. जास्त स्ट्रेस घेऊ नका, जास्त बोलू नका आणि काही दिवस लोकांना भेटणे टाळा, अशा सूचना डॉक्टरांनी दिल्या आहेत. त्यामुळे आगामी काही दिवस शरद पवार हे आपल्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानीच विश्रांती घेणार असून, त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यानंतरच ते पुन्हा एकदा राजकीय कामकाजात आणि बैठकांमध्ये सक्रिय होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून पुढील उपचार घरीच सुरू राहतील, अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉ. प्रतीत समदानी यांनी दिली आहे. डॉ. समदानी यांनी पवार यांच्या प्रकृतीबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, शरद पवार यांना छातीत संसर्ग झाला होता. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून, पुढील उपचार घरीच सुरू ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
शरद पवारांची प्रकृती सध्या स्थिर आहे. खरंतर, जेव्हा खोकला सुरू झाला, तेव्हा पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं. या ठिकाणी पवारांचे सातत्याने महिन्यातून एकदा उपचार सुरु असतात. म्हणूनच त्यांना या रुग्णालयात दोन दिवस आराम करण्यासाठी आणण्यात आलं होतं. त्यांना खोकला आणि कपचा त्रास सुरु होता, परंतू आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी आणि सुप्रिया सुळेंनी देखील दिली आहे.